नागपूर

Nagpur blast 15 dead | नागपूर हादरले ! स्फोटक निर्मिती कंपनीत भीषण स्फोट; १५ महिला कामगारांचा मृत्यू, अनेक महिला जखमी

अनेक महिला गंभीर भाजल्याने मृतांचा आकडा 20 वर जाण्याची भीती वर्तवली जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत आज (दि.१ मार्च) सकाळी भीषण स्फोट झाला. एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याला दुजोरा दिला आहे. होळी सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भिती

ज्यावेळी हा स्फोट झाला, त्यावेळी कंपनीत महिलांची शिफ्ट सुरू होती आणि तिथे किमान २५ महिला कामगार उपस्थित होत्या. या स्फोटात कंपनीतील १५ महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर अनेक महिला गंभीर भाजल्या गेल्याचेही समजते. त्यामुळे मृतांचा आकडा 20 वर जाण्याची भीती वर्तवली जात आहे. गंभीर जखमींना नागपुरातील ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कळमेश्वर तालुक्यातील एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली. घटनेची भीषणता बघता मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती असून मृतकांमध्ये महिला असल्याची माहिती आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाकडून स्फोटाची माहिती घेत, तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी जिल्हाधिकारी विपिन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक इतर वरिष्ठ अधिकारी, बीडीएस पथक उपस्थित आहेत.

ही औद्योगिक स्फोटके बनवणारी कंपनी असून ही कंपनी खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटके, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादने तयार करते अशी माहिती आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये कंपनी व्यवस्थापनाविरोधात रोष निर्माण झाला आहे.

स्फोटातील मृतदेह उद्या नातेवाईकांना सुपूर्द करणार

नागपूर - स्फोटातील मृत्युमुखी झालेल्या सर्व १७ कामगारांचे मृतदेह सोमवारच्या बैठकीत नुकसानभरपाई देण्याच्या निर्णयानंतर नातेवाईकांना सुपूर्द करणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आज त्यांनी घटनास्थळी भेट दिली. नागपूर जिल्ह्यातील एसबीएल एनर्जीमधील स्फोट प्रकरण संदर्भात सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्यासह जिल्हाधिकारी,पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

मृतक कामगारांचे जळालेले मृतदेह डीएनए तपासणीनंतरच संबंधिताना दिले जाणार असून सायंकाळी मृतांची संख्या 18 तर जखमी संख्या 24 झाल्याची माहिती पुढे येत आहे. एसबीएल कंपनी व्यवस्थापनाने या घटनेविषयी तीव्र दुःख व्यक्त करताना पॅकिंग सेक्शनमध्ये ही घटना घडली. कुठलीही निर्मिती प्रक्रिया सुरू नसल्याने स्फोटाची घटना कशी घडली हा तपासाचा भाग असून आम्ही सर्वतोपरी प्रशासनाला सहकार्य करीत आहोत. मृतांच्या कुटुंबियांना मदत आणि जखमींच्या उपचाराचा खर्च केला जाईल असेही स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT