नागपूर, पुढारी वृत्तसेवा : बोगस कागदपत्राच्या माध्यमातून 580 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्ती घोटाळा प्रकरणी आतापर्यंत नागपूर विभाग शिक्षण उपसंचालकासह पाच अधिकारी, कर्मचारी यांना अटक करण्यात आली असली तरी नियुक्ती ते वेतन निश्चिती अशी ही मोठी साखळी असल्याने या प्रकरणातील पाळेमुळे शोधून काढण्यासाठी आता शहर पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.
या संदर्भातील कार्यालयीन कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी सदर पोलिसांचे एक पथक तपास अधिकारी नरेंद्र तायडे यांच्या नेतृत्वात आज (दि.१५) दुपारी साडेचारच्या सुमारास सीताबर्डी परिसरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयात धडकले. अटकेत असलेले उपसंचालक उल्हास नरड यांच्या कार्यालयातून या घोटाळ्याचे तार कुठपर्यंत गेले आहेत. त्याचा मागोवा हे पोलीस पथक घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. साहजिकच विविध शाळांमधील या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता सहभागी आरोपींची संख्या निश्चितच वाढण्याची शक्यता आहे.