नागपूर : पर्यटकांना हमखास व्याघ्र दर्शनासाठी टायगर कॅपिटल अशी ओळख असलेल्या विदर्भात गेल्या काही दिवसात सातत्याने वाघाचा मृत्यू होत आहे. विदर्भात आज सोमवारी (दि. 17 )फेब्रुवारी रोजी भंडारा वन विभाग अंतर्गत नाकाडोंगरी वनक्षेत्रातील कवलेवाडा नियतक्षेत्र सीतासावंगी कक्ष क्रमांक 65 राखीव वन या ठिकाणी एक वन्य वाघ मृत अवस्थेमध्ये आढळून आला. ही माहिती गुराख्यामार्फत वनपरिक्षेत्राधिकारी, नाकाडोंगरी यांना सायंकाळी मिळताच वनाधिकारी, कर्मचारी पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मात्र बाह्य परीक्षणावरून सदर वाघाचा मृत्यू हा दोन वाघांच्या झुंजीत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या चमुद्वारे वर्तविण्यात आला आहे. वाघाच्या मृत्युचे कारण शोधण्यासाठी मृत वाघाचे नमुने उत्तरिय तपासणी करता न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. मृत वाघ हा नर असून त्याचे वय अंदाजे 3- 4 वर्षे असल्याचे निदर्शनास आले. मृत वाघाच्या तोंडावर, मानेवर व मागील पायाला जखमा असल्याचे दिसून आले. सर्व अवयव शाबूत असल्याचे निदर्शनास आले असून उद्या शवविच्छेदन केले जाणार आहे.