मोटरसायकल चोरी  File Photo
नागपूर

Nagpur Crime : ई-रिक्षा चोरीचा तपास करताना वाहनचोर जाळ्यात; ५ लाखांची सहा वाहने जप्त

नंदनवन पोलिसांची कारवाई; तीन ई-रिक्षा, दोन मोपेड आणि एका मोटरसायकलचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या ई-रिक्षेचा तपास करताना पोलिसांनी एका संशयित वाहनचोराला अटक केली. आरोपीच्या ताब्यातून तब्बल ५ लाख ४० हजार रुपये किमतीची सहा चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे नंदनवन आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहनचोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल उमाकांत ईटनकर (वय ३१, रा. दर्शन कॉलनी, सरकारी दवाखान्याजवळ, गजानन मंदिर परिसर, नंदनवन, नागपूर) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरबी येथील रहिवासी राकेश रामभाऊ ठाकरे यांनी त्यांची ई-रिक्षा (एमएच-४९/बीएम-५५१२) ही केडीके कॉलेज रोडवरील भगवती इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर उभी केली होती. ६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा ते दोनच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ई-रिक्षा चोरून नेली. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांच्या तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत एक व्यक्ती संघर्षनगर चौक परिसरात ई-रिक्षा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संघर्षनगर चौकात सापळा रचून राहुल ईटनकर याला चोरीच्या ई-रिक्षेसह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सदर ई-रिक्षा भगवती इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरून चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची अधिक चौकशी केली असता नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी काही वाहनचोरीच्या घटनांची माहिती समोर आली.

तीन ई-रिक्षा, दोन मोपेड आणि मोटरसायकल जप्त

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून तीन ई-रिक्षा, दोन मोपेड (अॅक्टिव्हा) आणि मोटरसायकल अशी सहा वाहने जप्त केली. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे ५ लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त वाहनांमध्ये ई-रिक्षा (एमएच-४९/बीएम-५५१२) १.७० लाख, मोपेड(एमएच-४९/बीएच-८७२४) ७० हजार, ई- रिक्षा (एमएच-४९/बीएम-७९४५) ८० हजार, मोपेड (एमएच-४०/बीएक्स-७१७९) ७० हजार, मोटरसायकल (एमएच-२७/डीएस-७१७६) ७० हजार आणि ई- रिक्षा (एमएच-४९/बीएम-३१४१) ८० हजार, यांचा समावेश आहे.

ही कारवाई नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने, पोलीस उपनिरीक्षक संतोषकुमार रामलोड, पोलीस हवालदार दिनेश जुगनाहाके, पोलीस शिपाई प्रविण मरापे, राहुल खळतकर, सोमेश्वर घुगल आणि महिला पोलीस हवालदार स्वाती कुमरे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT