नागपूरात खाणीतील खड्ड्यात बुडून 5 जणांचा मृत्यू File Photo
नागपूर

Nagpur Drowning News | नागपूरात खाणीतील खड्ड्यात बुडून 5 जणांचा मृत्यू

अपघात की सामुहिक आत्‍महत्‍या ? घटनास्‍थळी चर्चा, उमरेड तालुक्‍यातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Drowning News

नागपूर : जिल्ह्यातील कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरगावातील गर्ग खदानीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह सोमवारी (दि.१२) सायंकाळी बाहेर काढण्यात आले. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात सर्वच जण पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज कुही पोलिसांनी लावला आहे. दुसरीकडे एकाचवेळी पाच मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि एका युवकाचा समावेश आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात सुरगाव शिवार येथील ही घटना आहे. याप्रकरणी कुही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृत्यूमागील गूढ उलगडण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. रोशनी चंद्रकांत चौधरी (वय ३२, रा. धुळे), मुलगा मोहित चंद्रकांत चौधरी (वय १२), मुलगी लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (वय १०), बहीण अंजली ऊर्फ रज्जो राऊत (वय २५ रा. नागपूर) आणि रज्जोचा मित्र इंतिराज अन्सारी (वय २०, रा. नागपूर) अशी मृतांची नावे आहेत.

रोशनी चौधरी ही मूळची नागपूरची असून ती बहिण रज्जो राऊतकडे आली होती. मुलगा मोहित, मुलगी लक्ष्मी आणि बहिण रज्जो व तिचा मित्र इंतिराज रविवारी पर्यटनासाठी कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूरगाव येथे गेले होते. दरम्यान, गर्ग खदानाच्या काठावर ते सर्वजण काही वेळपर्यंत बसले होते. पोलिसांच्या अंदाजानुसार, खदानीतील पाणी स्वच्छ असून मुलांनी आंघोळ करण्याचा हट्ट धरला असावा मात्र, खदान खोल असल्याचा अंदाज कुणालाच न आल्याने ते बुडले असावेत. दोन्ही मुले अर्धनग्नावस्थेत असल्यामुळे ते आंघोळ करायला पाण्यात उतरल्याची शक्यता आहे. दरम्यान, मोहित आणि लक्ष्मी पाण्यात बुडत असताना आई रोशनी हिने पाण्यात उडी घेतली असावी. बहिणीला आणि मुलांना वाचविण्यासाठी रज्जोनेसुद्धा पाण्यात उडी घेतली. सर्वच जण पाण्यात बुडत असताना इंतिराज अन्सारी याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असावा, असे बोलले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच उमरेडच्या पोलीस उपविभागीय अधिकारी वृष्ठी जैन, कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर, कुही पाचगाव पोलीस चौकीचे प्रभारी हरिचंद्र इंगोले, हवालदार दिलीप लांजेवार, हे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने तातडीने मदतकार्य सुरू केले. नागपुरातील गोताखोर जगदीश खरे यांच्या मदतीने ४ तासांच्या शोध मोहिमेत पाचजणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह पुढील तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT