नागपूर, पुढारी वृत्तसेवा : विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या लोकशाही दिनात नागपूर मनापाचे तीन ,भंडारा आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशी एकूण पाच प्रकरणे निकाली काढण्यात आलीत. तसेच, नव्याने दाखल वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील दोन प्रकरणांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागविला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज यावर्षातील पहिला लोकशाही दिन पार पडला. सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील अतिक्रमणासंबंधातील तीन प्रकरणे यावेळी निकाली काढण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील अतिक्रमाणाबाबतचे आणि वर्धा जिल्ह्यातील मोजणी संबंधातील प्रत्येकी एक प्रकरण यावेळी निकाली काढण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध विभागांना दिलेल्या 100 दिवसांचा आरखडा व सात कलमी कार्यक्रमाबाबत विभागीय लोकशाहीदिनानंतर श्रीमती बिदरी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व विभागांचा आढावा घेतला. विभाग व विषय निहाय कामाच्या प्रगतीबाबत माहिती जाणून घेत त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना उद्दिष्टयपूर्तीबाबत सूचना दिल्या.