Petrol Diesel stock Nagpur
नागपूर : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, गॅससाठा मुबलक प्रमाणात असून त्याचे प्रशासनामार्फत काटेकोर सनियंत्रण केले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वरिष्ठ पातळीवरून नित्य आढावा घेत आहेत.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला आवश्यक तेवढीच इंधनाची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. शहरात अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.
कुणाच्या मनात जर भीती असेल तर त्यांनी मनातून काढून टाकावी. जिल्ह्यात कुठलीही पॅनिक स्थिती नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यांनी सांगितले.
पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर उर्जेबाबत केंद्र शासन तसेच राज्य सरकारकडूनही यापूर्वीच स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने विविध अत्यावश्यक बाबींच्या सनियंत्रणासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.
वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. दरम्यान ,अत्यावश्यक सेवेबाबत चुकीच्या अफवा पसरविणाऱ्यांबद्दल अथवा यात अडथळा आणणा-यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी स्पष्ट केले