नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे रिकार्पेटिंग मे 2025 पर्यंत पूर्ण होईल असे संबंधित कंपनीने सांगितले असताना महिनाभरात हे काम पूर्ण करा अशी तंबी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यानंतर नागपूर येथील धावपट्टीचा हा विषय चर्चेत आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांच्याकडे मिहान इंडिया लिमिटेड एमआयएलचे अध्यक्ष पदाचा तसेच व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी एमआयडीसीचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक हे एमआयएलचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक असतात. आता पहिल्यांदाच जिल्हाधिकारी पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडे ही सूत्रे देण्यात आलेली आहेत. आजवर अध्यक्षपद तसेच व्यवस्थापकीय संचालक पद स्वाती पांडे यांच्याकडे होते. एमआयडीसीच्या उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक देखील त्या आहेत. धावपट्टीचे रिकार्पेटिंग रखडल्याने नागपुरातून दिवसभरात विमानसेवा बंदच असते. त्यामुळे अनेक विमानांचे उड्डाण प्रभावित झाले. या पार्श्वभूमीवर आगामी उन्हाळ्यातील हवाई प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता नागपुरातील विमानतळाच्या धावपट्टीचे काम तातडीने व्हावे यासाठीच ही जबाबदारी डॉ. इटनकर यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती आहे.
स्थानिक पातळीवर ते दररोज या कामाचा आढावा घेऊ शकतात. यापूर्वी त्यांच्याकडे एमआयडीसीच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त पदभार देखील सोपविण्यात आला होता. नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराच्या दृष्टीने एक सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.