नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळाप्रकरणी सावनेर शेतकरी व खातेदार संघटनेच्या वतीने आज (दि.२) बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून बँक घोटाळ्याचे करोडो रुपये वसूल करून पीडित शेतकरी व खातेदारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही, असा इशारा भाजप प्रवक्ते, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी दिला. (Nagpur District Bank Scam)
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 153 कोटींच्या घोटाळ्यात न्यायालयाने आरोपी ठरविलेले माजी मंत्री काँग्रेसचे सुनील केदार यांच्याकडून बँक घोटाळ्यातील सव्याज 1444 कोटींच्या दोन महिन्याचे वसुलीसाठी गांधी चौक सावनेर येथे हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आंदोलनाच्या सुरुवातीला शेतकरी व खातेदारांचा बैलबंडी धडक मोर्चा काढण्यात आला आणि संपत खलाटे, उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी, सावनेर यांना निवेदन देण्यात आले. वसुलीच्या कारवाईसाठी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केल्या गेले. (Nagpur District Bank Scam)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनासुद्धा विनंती आहे की, त्यांनी गरीबांचा पैसा वसूल करण्यात पुढाकार घ्यावा. सुनील केदार यांनी या पैश्याच्या जोरावर या क्षेत्रात दहशत माजविली आहे. रेतीघाटाच्या चोरीसाठी ते सर्वश्रुत आहेत. रेतीघाट, टोल, डब्ल्यूसीएल, कारखानदार यांच्याकडून त्यांनी सतत वसुलीचे काम केले आहे. तरी पीडित शेतकरी व खातेदारंना न्याय मिळवून देणार आहे, असा दावा माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी केला. (Nagpur District Bank Scam)
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, डॉ. राजीव पोद्दार, मनोहर कुंभारे, प्रकाश टेकाडे, ओमप्रकाश कामडी, दिनेश ठाकरे, दिलीप धोटे, विजय देशमुख, बँकेचे ठेवीदार व्यापारी, शेतकरी, खातेदार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.