Mother and Son killed Nagpur
नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा बु येथे बुधवारी (दि.२७) दुपारी तीन वाजून पाच मिनिटांच्या सुमारास झालेल्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसामुळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतात काम करीत असताना अचानक वीज पडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वंदना प्रकाश पाटील (37) त्यांचा मुलगा ओम प्रकाश पाटील (18) असे आई मुलगा आणि निर्मला रामचंद्र पराते (60) सर्व राहणार धापेवाडा या महिलांचा समावेश आहे.
दोन वर्षांपूर्वी वंदना पाटील यांचे पती प्रकाश पाटील यांचे निधन झाले. त्यानंतर आई आणि मुलगा शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मुलगी पिहूचे शिक्षण त्यांनी यातून सुरू ठेवले होते. परंतु, आजच्या या दुर्दैवी घटनेत आई आणि मुलगा दोघेही दगावल्याने घरात केवळ १५ वर्षीय पिहू प्रकाश पाटील हीच एकुलती एक मुलगी राहिली आहे.
वीज कोसळल्याचा जोरात आवाज झाल्याने आसपासच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते दिवाकर कडू यांनी तत्काळ तहसीलदार, तलाठी व ग्रामपंचायत सचिवांना माहिती दिली.घटनास्थळी सचिव ईश्वर धुर्वे, कोतवाल मंगेश पारसे, पटवारी नितेश मोहितकर यांनी धाव घेत पंचनामा केला. गणेश चतुर्थीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. शासन, प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी आहे. सरकारने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी, अशीही मागणी पुढे आली आहे.