नागपूर - विदर्भातील राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे आज रविवारी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे सागर मेघे व आमदार समीर मेघे ही दोन मुले, सुना. नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. मेघे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला. गेले ४० वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या दत्ता मेघे यांनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव काम केले. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच खामला पांडे लेआऊट येथील निवासस्थानी सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी ,चाहत्यांनी गर्दी केली.
गरीब परिस्थितीतून पुढे आलेले दत्ता मेघे यांनी विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसमध्ये केली. त्यांनी वर्धा,रामटेक, नागपूर लोकसभा मतदार संघातून चार वेळा प्रतिनिधित्व केले. राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. ते ३ वेळा विधान परिषद सदस्य,मंत्रीही होते. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पुलोद सरकारमध्ये ते विदर्भातून मंत्री होते. १९९१ मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय संपादन केला. यानंतर रामटेक (१९९६ व वर्धा (१९९८) या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत.
दत्ता मेघेच्या मृत्यूपत्रात नितीन गडकरी यांचे नाव
राजकारणात अनेक व्यक्ती नात्यापलीकडच्या असतात. त्यांच्यावर प्रचंड विश्वास असतो. ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दत्ता मेघे यांच्या बाबतीत प्रकर्षाने दिसते. दत्ता मेघे आणि नितीन गडकरी यांची मैत्री अनोखी होती. माजी खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी आपल्या मृत्युपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव टाकले आहे. खुद्द मेघे यांनी ही माहिती १९ ऑक्टोबर २०२१ रोजी वर्धा येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात दिली. "सर्व पक्षांशी मी चांगले संबंध प्रस्थापित केले. नितीन गडकरी आमच्या फॅमिलीचे महत्वाचे नेते आहेत. मी माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये म्हणून त्यांचे नाव दिले आहे', असे मेघे यांनी तेव्हा सांगितले होते.
असा मोठ्या मनाचा नेता होणे नाहीः गडकरी यांची मेघे यांना आदरांजली
नागपूर -ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आणि माझ्या ज्येष्ठ बंधूंसारखे असलेले दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. दत्ताभाऊंच्या जाण्याने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली. दातृत्व अंगी असलेला असा मोठ्या आणि निर्मळ मनाचा नेता पुन्हा होणे नाही या शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. विदर्भातील शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील दत्ताभाऊंचे योगदान उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. गडचिरोलीपासून मेळघाटपर्यंत आदिवासी भागात दत्ताभाऊंनी मोफत वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचे आरोग्य सुधारण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले. सावंगी मेघे येथे त्यांनी गरिबांसाठी मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले. विदर्भातील तरुणांना उच्चशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली. माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात आणि पुढेही वैचारिक विरोधक असूनही दत्ताभाऊंनी कायम मला प्रेम-जिव्हाळा दिला व मार्गदर्शन केले. लहान बंधू प्रमाणे त्यांनी नेहमीच माझ्यावर प्रेम केले. प्रकृती अस्वास्थ्य असूनही विदर्भातील ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ कायम होती. त्यांचे सर्वसमावेशी नेतृत्व राजकीय कार्यकर्त्यांसाठी आदर्श होते असेही गडकरी यांनी म्हटले आहे.
गरिबांना मदत करणारे ‘ दाताभाऊ‘ गेले : चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर - आयुष्यभर जोपासलेल्या सेवाभावी आणि दातृत्वाच्या वृत्तीने सामान्य माणसाच्या मनात कमालीचा आदर आणि श्रद्धा निर्माण करणारे ज्येष्ठ भाजपा नेते आणि माझे मार्गदर्शक दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
दत्ताभाऊ प्रदीर्घ काळ राजकारणात होते. त्यांनी खासदार, आमदार, मंत्री अशी अनेक सन्माननीय पदे भूषविली. राजकारण आणि सत्तेच्या माध्यमातून गरीब, सामान्य माणसाचे कल्याण केले पाहिजे, हे संस्कार त्यांनी आम्हा सर्वांना दिले. शाळा तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. त्यांनी असंख्य गरीब मुलांना निःशुल्क शिक्षण दिले. गरीब मुला- मुलींचे लग्न लावून दिले. गरिबांचे संसार उभारले.
दत्ताभाऊंनी त्यांच्याकडे आलेल्या गरजू माणसाला कधीच रिकाम्या हाताने परत पाठविले नाही. त्यांच्या दारात आलेला प्रत्येक दुःखी माणूस आनंद घेऊनच परत गेला. शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी आयुष्यभर गरिबांना सढळ हाताने मदत केली. त्यामुळेच त्यांना सर्वजण श्रद्धेने ‘ दाताभाऊ‘ म्हणायचे याकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधले.