Cyber Scam File Photo
नागपूर

Nagpur Cyber Scam: बनावट बँक खाती, २३६ एटीएम, ८५ चेकबुक आणि ४५ सिमकार्ड्स...; नागपुरात तब्बल ९० कोटींचा सायबर घोटाळा

सायबर गुन्हेगारांना बनावट बँक खाती उपलब्ध करून देत नागरिकांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी मदत करणाऱ्या टोळीचा नागपूर शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Cyber Scam:

नागपूर : सायबर गुन्हेगारांना बनावट बँक खाती उपलब्ध करून देत नागरिकांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी मदत करणाऱ्या टोळीचा नागपूर शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विविध बँकांमध्ये उघडलेल्या संशयास्पद खात्यांमध्ये तब्बल ९० कोटी २५ लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून २३६ एटीएम कार्ड, ८२ पासबुक, ८५ चेकबुक, १८० कोरे धनादेश, ४५ सिमकार्ड, केवायसी कागदपत्रांसह मोठ्या प्रमाणात बँकिंग साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय सायबर टोळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

१०४ तक्रारींमुळे नेटवर्कची व्याप्ती स्पष्ट

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी विविध बँकांमध्ये खाती उघडून ती सायबर फसवणुकीसाठी वापरण्यास उपलब्ध करून देत असल्याचा संशय आहे. या खात्यांमध्ये महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून तब्बल १०४ तक्रारींशी संबंधित व्यवहार आढळून आले आहेत. त्यामुळे हे नेटवर्क केवळ नागपूर किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्याची व्याप्ती आंतरराज्यीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. सायबर गुन्ह्यांमधून मिळणारी रक्कम या खात्यांमध्ये वळवून पुढे ती अन्य खात्यांमध्ये हस्तांतरित केली जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण साखळी तपासण्याचे काम सध्या सुरू आहे.

२३६ एटीएम कार्डांचा साठा; १८० कोरे धनादेश जप्त

पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेला बँकिंग साहित्याचा मोठा साठा या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखीत करतो. कारवाईत २३६ विविध बँकांचे एटीएम कार्ड, ८२ पासबुक, ८५ चेकबुक आणि १८० कोरे धनादेश आढळून आले. याशिवाय ४५ विविध मोबाइल कंपन्यांचे सिमकार्ड, १३ रबर स्टॅम्प, ४ निवडणूक ओळखपत्रे, १४ आधारकार्ड, ५ पॅनकार्ड, ३ आरसी कार्ड, २ अन्य ओळखपत्रे, १ स्वाइप मशीन, ५ डायऱ्या आणि ७ बँक स्कॅनर जप्त करण्यात आले आहेत.

बँक खाती उघडण्यासाठी वापरण्यात आलेली केवायसी कागदपत्रे तसेच विविध खात्यांची पासबुक, चेकबुक आणि संबंधित कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बँकिंग साहित्य आणि ओळखपत्रे आढळल्याने बनावट अथवा इतरांच्या नावाने बँक खाती उपलब्ध करून देण्याची टोळी कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे.

सहा आरोपी अटकेत

या प्रकरणात पोलिसांनी उज्ज्वला ताराचंद राजगिरे (३२, रा. धानला, ता. मौदा), इरफान वल्द इक्बाल शेख (३२, रा. भंडारा), मुणाली दिगंबर कांबळे (२६, रा. सालाई गोधणी, नागपूर), निधिता अमित रामटेक (२२, रा. गजानननगर, हुडकेश्वर-पिपळा रोड, नागपूर), आयुष चंद्रकांत रामटेक (२०, रा. बालाजीनगर, मानेवाडा रोड, नागपूर) आणि आदित्य राहुल दुपारे (२०, रा. न्यू कैलासनगर, मानेवाडा रोड, नागपूर) यांना अटक केली आहे. संशयित आरोपींना १० ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला आहे. त्यांच्या चौकशीतून आणखी काही व्यक्तींची नावे आणि बँक खात्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी संबंधांचा संशय

या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या नेटवर्कचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी जोडलेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून खाती उघडली, या खात्यांमध्ये कोणत्या सायबर गुन्ह्यांमधील रक्कम जमा झाली, ती पुढे कुठे वळविण्यात आली आणि या संपूर्ण व्यवहारातून कोणाला आर्थिक फायदा झाला, याचा तपास सुरू आहे. तसेच आरोपींनी आणखी किती बँक खाती उपलब्ध करून दिली आहेत आणि या खात्यांचा वापर किती सायबर गुन्ह्यांमध्ये झाला आहे, याचाही शोध घेतला जात आहे.

आर्थिक व्यवहारांच्या तपासाला वेग

सायबर फसवणुकीतील रकमेचा माग काढताना अनेक बँक खाती, मोबाइल क्रमांक, सिमकार्ड आणि विविध राज्यांतील व्यवहारांची सांगड घालावी लागते. नागपूर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासासोबतच संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि उपलब्ध कागदपत्रांची छाननी करून या नेटवर्कपर्यंत मजल मारली. या तपासातून समोर आलेल्या ९० कोटी २५ लाख रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची संपूर्ण आर्थिक साखळी आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. या व्यवहारांमागील मूळ सायबर गुन्हेगार तसेच त्यांना बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या संपूर्ण यंत्रणेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तपास पथकाकडून केला जात आहे.

पोलीस आयुक्त डॉ. विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (सायबर) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे व सुरेश डांबर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक दर्शन थोरात, संतोष ओवांडकर, सफौ दत्ता निनावे, पोहवा गजानन मोरे, जितेंद्र पदाडे, स्वप्नील बडे, सुरज भारती, पोअं. विजय तेलमोरे, आकाश मकेश्वर, पवन कावळे, आशिष खोपे, भारत टेकाम, महिला अंमलदार निशीका बांते, निधी भुरले, आकांक्षा सिंग तसेच वाहनचालक सफौ संजय मुडे यांचा सहभाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT