नागपूर : नागपुरातील एमडी ड्रग्ज प्रकरणात पोलिसांना आपले नाव सांगितल्याच्या संशयातून एका हिस्ट्रीशीटरने तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. "सात दिवसांच्या आत डोक्यात गोळी घालून ठार मारीन, तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवीन," अशी धमकी दिल्याची तक्रार पीडिताने पाचपावली पोलिस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी असंज्ञेय गुन्ह्याची (एनसी) नोंद केली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानकापूर येथील रहिवासी अब्दुल करीम ऊर्फ लाला अजीज शेख (वय ४१) यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, ७ जुलै रोजी सायंकाळी ते हबीब नगर, टेका येथे मित्र शाहिद अख्तर अन्सारी याला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी अजहर अली याने आपल्या मोबाईलवरून त्यांचे फिरोज ऊर्फ हड्डी खान याच्याशी बोलणे करून दिले.
फोनवर फिरोज ऊर्फ हड्डी खान याने शिवीगाळ करत एमडी ड्रग्ज प्रकरणात पोलिसांना आपले नाव अब्दुल करीम यांनीच सांगितल्याचा आरोप केला. त्यानंतर "सात दिवसांच्या आत डोक्यात गोळी घालून ठार मारीन," अशी उघड धमकी दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय, यापूर्वीही हत्या करण्याच्या उद्देशाने तो आपल्या घराजवळ आला होता आणि हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचेही त्याने धमकीच्या स्वरात सांगितल्याचा आरोप पीडिताने केला आहे. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, फिरोज ऊर्फ हड्डी खान हा २०२५ मध्ये वाठोडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या सुमारे ११० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्ती प्रकरणातील फरार आरोपी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच पोलिस आणि एनडीपीएस विभागातील अधिकाऱ्यांशी आपले संबंध असल्याचा दावाही त्याने फोनवर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या धमकीमुळे स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाल्याचे सांगत अब्दुल करीम यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. संबंधित आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांनी विनंती केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी असंज्ञेय गुन्ह्याची (एनसी) नोंद केली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला तक्रारदाराला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.