Murder Pudhari
नागपूर

Nagpur Murder | अंगावर ‘तर्री’ उडाल्याच्या वादातून युवकाची निर्घृण हत्या!

 महिलेसह सहा जणांवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : एका नाश्त्याच्या दुकानात अंगावर तर्री उडाल्यावरून सुरू झालेल्या वादाचा शेवट तरुणाच्या रक्तरंजित हत्येने झाला. नागपूरच्या भरतवाडा परिसरात ही धक्कादायक आणि थरकाप उडविणारी घटना घडली. दोन युवकांमध्ये झालेला वाद एका महिलेच्या घरासमोर पोहोचला. तेथे शिवीगाळ करणाºया दोघांना महिलेने हटकले. मात्र महिलेला शिवीगाळ केल्यामुळे तिच्या कुटुंबातील सात जणांनी युवकाला मारहाण केली. महिलेच्या मुलाने चाकूने वार करून त्याचा निर्घृण खून केला. याप्रकरणी कळमना पोलिसांनी सहा जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

योगेश बीरसिंग शाहू (वय २८, रा. भगतनगर) असे खून झालेल्या युवकाचे तर शुभम राजेश पिलारे (वय २०), राजेश दुधराम पिलारे (वय ५२), सरिता राजेश पिलारे (वय ४७), शिवाणी राजेश पिलारे (वय २४), प्रफुल्ल सुरेश बांते (वय १८), शुभांगी सुरेश बांते (वय ४५, सर्व रा. साईकृपा सोसायटी) आणि मंगेश रहांगडाले (वय २०, रा. गुलमोहरनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, राजा शाहू, रोहित आणि योगेश शाहू हे कामगार असून रविवारी सकाळी ९ वाजता ते कामावर गेले. १०.३० वाजता काम आटोपून भरतगनर रोडवरील अंकित नाश्ता सेंटरवर आले. नाश्ता करताना योगेश शाहूकडून मंगेश रहांगडालेच्या अंगावर तर्री उडाली. त्यावरून दोघांत वाद झाला. हॉटेलमालकाने दोघांनाही हॉटेलबाहेर काढले. ते वाद घालत शिवाणी पिलारे नामक महिलेच्या घरासमोर पोहोचले.

तिच्या घरासमोर उभे राहून एकमेकांशी शाब्दिक बाचाबाची करीत होते. घरात गोंधळ ऐकू आल्याने तिने बाहेर येत ‘माझ्या घरासमोर भांडू नका, निघा येथून’, असे खडसावले. आधीच संतप्त असलेला योगेश शाहू महिलेच्या टोमण्यामुळे भडकला. त्याने शिवाणी पिलारेला शिवीगाळ केली. त्यामुळे शिवाणीची आई सरिता पिलारे घरातून बाहेर आली. तिने योगेशच्या कानशिलात लगावली. वाद वाढल्याचे पाहून घरातील अन्य सदस्य राजेश पिलारे, प्रफुल्ल बांते आणि शुभांगी बांते बाहेर आले. त्यांनी योगेशला घेरून हुज्जत घातल्यानंतर मारहाण केली.

वाद सुरू असतानाच महिलेचा भाऊ शुभम पिल्लारे (वय २०, रा. भरतवाडा) हा तिथे पोहोचला. आपली बहीण आणि कुटुंबीयांसोबत योगेश वाद घालत असल्याचे पाहून त्याचा राग अनावर झाला. काहीही विचार न करता त्याने जवळ असलेले धारदार शस्त्र काढले. योगेश शाहूवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. हल्ला इतका भीषण होता की, योगेश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. हल्ल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या योगेशला राजा आणि रोहित यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र शरीरातून अतिरक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भरदिवसा घडलेल्या थरारामुळे भरतवाडा आणि भगतनगर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

माहिती मिळताच कळमना पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपी शुभम पिलारे, त्याची बहीण (संबंधित महिला) आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह सहा जणांना आरोपी केले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी चक्रे फिरविली. काही संशयितांना ताब्यात घेतले. कळमना पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT