Case registered Pudhari File Photo
नागपूर

Nagpur crime: जिवंत डिटोनेटर घेऊन पोहोचला नागपुरात; वरोरा येथून आलेल्या युवकाला लकडगंज पोलिसांची अटक

दोन डिटोनेटर, तीन चोरीचे मोबाइल आणि १२ मीटर लीड वायर जप्त

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : जिवंत डिटोनेटर, लीड वायर आणि चोरीचे मोबाइल घेऊन वरोरा येथून नागपुरात आलेल्या ३५ वर्षीय युवकाला लकडगंज पोलिसांनी सेंट्रल एव्हेन्यू परिसरातील आजमशाह चौकातून अटक केली. राजेंद्र रामलाल विश्वकर्मा (वय ३५, मूळ रा. बालोद, छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन जिवंत डिटोनेटर, तीन चोरीचे मोबाइल आणि १२ मीटर लीड वायर जप्त करण्यात आली. संवेदनशील परिसरात जिवंत डिटोनेटर आढळल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

राजेंद्र हा वरोरा येथील वेकोलिच्या खाणीत श्रमिक म्हणून काम करतो. मंगळवारी तो रेल्वेने नागपुरात आला. त्याच्याकडे पैसे नसल्याने आजमशाह चौक परिसरात चोरीचे मोबाइल तसेच डिटोनेटर विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती लकडगंज पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आजमशाह चौकाजवळ महालसारखा संवेदनशील परिसर तसेच पोलिस मुख्यालय परिसर असल्याने पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने कारवाई केली. झडतीदरम्यान राजेंद्रकडून तीन मोबाइल, दोन जिवंत डिटोनेटर आणि १२ मीटर लीड वायर मिळून आली.

वेतन न मिळाल्याने चोरी केल्याचा दावा

प्राथमिक चौकशीत राजेंद्रने वेतन न मिळाल्याच्या रागातून कंत्राटदाराचे तीन मोबाइल आणि वरोरा येथील खाणीतून दोन डिटोनेटर चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्याचा हा दावा कितपत खरा आहे, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी लकडगंज पोलिसांचे पथक वरोरा येथे रवाना झाले आहे.

डिटोनेटर कोणाला विकणार होता?

राजेंद्र हा जिवंत डिटोनेटर नेमका कोणाला विकणार होता, याचा पोलिस तपास करत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी एटीएस, गुप्तचर यंत्रणा तसेच पीईएसओच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. डिटोनेटर त्याच्यापर्यंत कसे पोहोचले, त्याने ते नागपुरात का आणले आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या दिशेने तपास सुरू आहे. न्यायालयाने आरोपी राजेंद्र विश्वकर्मा याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पोलिस चौकशीत डिटोनेटर प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT