नागपूर: बुलेटवरून जात असलेल्या तरुणीचा पाठलाग करून तिच्याकडे कथितरीत्या अश्लील हावभाव केल्याचा प्रकार नागपुरात समोर आला आहे. बैद्यनाथ चौकातून नवीन उड्डाणपुलाच्या दिशेने जात असताना तीन तरुणांनी तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. तरुणीने तिघांनाही जाब विचारत चांगलेच फटकारले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इमामवाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची वाहनेही जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आपल्या बुलेटवरून बैद्यनाथ चौकातून नवीन उड्डाणपुलाच्या दिशेने जात होती. त्याचवेळी दुचाकीवरून तीन तरुण तिच्या मागे येत होते. या तरुणांनी तिच्याकडे अभद्र हावभाव करत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
हा प्रकार लक्षात येताच तरुणीने त्याला विरोध केला. तिने तिघांनाही थांबवत त्यांच्या वर्तनाबद्दल जाब विचारला आणि फटकारले. यावेळी घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला. काही वेळातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर इमामवाडा पोलिसांनी कारवाई करत गौरव पुरुषोत्तम दानडे, प्रणय ऊर्फ गोलू दत्ताराम कालकर आणि धीरज भानारकर या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी महिलांशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणांमध्ये नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे