नागपूर - नागपूरच्या किदवई हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेजमधील सगीर अहमद या शिक्षकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक मजीब पठाण आणि मुतज्जिम खान यांनी हल्ला केल्याचा आरोप संबंधित शिक्षकांनी केला आहे. किदवाई हायस्कूल आशीनगर उत्तर नागपूर परिसरात आहे.
जखमी शिक्षक सगीर अहमद यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ट्रॉमा केअरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त किदवई हायस्कूल येथे नोकरी करणाऱ्या सगीर अहमद यांच्याकडून दरमहा ३० हजार रुपये मुख्याध्यापकांकडून घेतले जात असल्याचा आरोप आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर काही दिवसात ७५ शाळांना अल्पसंख्याक विकास विभागाकडून अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याच्या प्रकरणानंतर राज्यातील अल्पसंख्याक शाळांमधील गैरप्रकारांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या आदेशानंतर सगीर अहमद यांनी दरमहा ३० हजार रुपये देणे बंद केले होते. याच रागातून मुख्याध्यापक आणि अन्य संबंधित व्यक्तीने सगीर अहमद यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.