नागपूर: बेंगळुरूमध्ये पत्नीने जीवन संपवल्याच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच, नागपुरातील एका हॉटेलमध्ये माय-लेकाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. या हृदयद्रावक घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, आईची प्रकृती चिंताजनक आहे.
मूळचे बेंगळुरू येथील रहिवासी असलेले जयंती आणि त्यांचा मुलगा सुरज हे काही दिवसांपूर्वी नागपुरात आले होते. शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम ठोकला होता. मात्र, तिथेच दोघांनीही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुरजचा मृत्यू झाला, तर जयंती यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्या मृत्यूशी झुंज देत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जीवन संपवण्यामागे कौटुंबिक वादाची मोठी पार्श्वभूमी आहे. सुरजचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र, गुरुवारी (दि.२५) त्याच्या पत्नीने बेंगळुरूमध्ये राहत्या घरी जीवन संपवले. पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी सुरज आणि त्याच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप केला. या मागणीसाठी नातेवाईकांनी बेंगळुरू येथील पोलीस स्टेशनसमोर तीव्र निदर्शने देखील केली होती.
बेंगळुरूमध्ये नातेवाईकांचे आंदोलन आणि पोलिसांमार्फत सुरू असलेली कारवाई यामुळे सुरज आणि त्याची आई प्रचंड मानसिक तणावाखाली होते. याच विवंचनेतून त्यांनी नागपूर गाठले आणि हॉटेलमध्ये हे टोकाचे पाऊल उचलले. सोनेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल रॉयल वीला हॉटेल लिजेड इनच्या मागे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.