नागपूर : काही दिवसांपूर्वी सोसा कॅफे चालक अविनाश भुसारी यांची गोळ्या घालून हत्या प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून तीन दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. या तपासात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलला नागपूरातील पांढराबोडी परिसरात निघणाऱ्या शोभायात्रेत गोळीबार करून दंगल घडविण्याचा कट कुख्यात बंटी हिरणवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आखला होता अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याविषयीची माहिती पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शैलेश उर्फ बंटी विनोद हिरणवार वय 31, अंकित उर्फ बाबू धीरज हिरणवार वय 22, आदर्श उर्फ गोटा रत्नाकर वालके वय 20, रोहित उर्फ भिकू राजू मेश्राम यांना पोलिसांनी अटक केली आहे. खापरखेडा येथील शेखू टोळीतील प्रवेश गुप्ता, अविराज भुसारी व त्याच्या साथीदारांनी गोळीबार करून बंटीचा भाऊ पवन याची हत्या केली होती. यात बंटी ही जखमी झाला. भावाच्या कुणाचा बदला घेण्यासाठी बंटी, बाबू व त्याच्या साथीदारांनी प्रवेश व धीरज बांबोडे या दोघांच्या हत्येचा कट रचला. प्रवेश 14 एप्रिलला दरवर्षी शोभायात्रा काढत असल्याची माहिती बंटीला होती. याचवेळी प्रवेशची हत्या या शोभायात्रेत करायची व दंगल घडवित पसार व्हायचे असा गेम बंटीने आखला.
सायंकाळी ते पांढराबोडीत गेले मात्र या ठिकाणी प्रवेश आलाच नाही, त्यामुळे बंटीने गोळीबार केला नाही. सुदैवाने धीरज व बंटी दोघेही बचावले. मात्र, 15 एप्रिल रोजी मध्यरात्री बंटी व त्याच्या साथीदारांना अविनाश भुसारी हा कॅफेसमोर सापडला. लागलीच डोक्यात चार गोळ्या घालून त्याची हत्या केली आणि ते पसार झाले. विशेष म्हणजे बंटीने पिस्तूल खरेदीसाठी एका नातेवाईक महिलेकडे सव्वा लाखाची चोरी केली. ऑटोचालक शाहिदकडून प्रत्येकी 45 हजार रुपयात तीन पिस्तूल खरेदी केले. 30 काडतुसे एकाकडून खरेदी केली. शेखू याने अविराज व साथीदारांच्या मदतीने पवन आणि बंटीच्या खुनाचा कट आखला. अविराज याने याबाबत अविनाशला माहिती दिली. डिसेंबर महिन्यात अविनाशने अब्बास उर्फ अबु खान याला याबाबत कळविले. खून होणार असल्याची माहिती दिली होती असेही तपासात उघड झाले आहे.