नागपूर

Nagpur Crime : नागपुरात एनडीपीएस पथकाची मोठी कारवाई; 50 किलोहून अधिक गांजा जप्त

पारडी हद्दीत ट्रकमधून 27.79 लाखांचा मुद्देमाल जप्त; एका आरोपीला अटक, ओडिशातील साथीदाराचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) पथकाने सोमवारी मोठी कारवाई करत पारडी पोलीस ठाणे हद्दीत एका ट्रकमधून 50 किलो 560 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत ट्रक व मोबाईलसह सुमारे 27 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पद हालचाल करणाऱ्या ट्रक चालकाला ताब्यात घेत मोठी कारवाई केली. ही कारवाई पारडी पोलीस ठाणे हद्दीतील वन उपज नाक्यासमोर, उमिया कॉम्प्लेक्सजवळ, भंडारा–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीपीएस पथक पेट्रोलिंग करत असताना संबंधित ट्रक चालकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर एनडीपीएस कायद्यातील सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करून वाहनाची तपासणी आणि झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान ट्रकच्या कॅबिनमध्ये लपवून ठेवलेला 50 किलो 560 ग्रॅम गांजा आढळून आला.

या प्रकरणात मोहम्मद अलाउद्दीन मोहम्मद जमालुद्दीन शराफत अली मलिक (वय 40) रा. माडा क्वार्टर, कपिलनगर, नागपूर याला अटक करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात ओडिशा राज्यातील संबलपूर येथील एका अनोळखी व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय असून त्याचा शोध सुरू आहे.

कारवाईदरम्यान गांजा, अशोक लेलँड कंपनीचा सहा चाकी ट्रक आणि ओपो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण अंदाजे 27 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT