नागपूर

Nagpur Crime : पोटच्या मुलीला २३ हजारांत विकून आई प्रियकरासह पसार; केळवद पोलिसांकडून ८ जणांना बेड्या

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : आईने प्रियकराच्या मदतीने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची २३ हजारांमध्ये विक्री केली. तिचे लग्नही लावून दिले. ही धक्कादायक घटना केळवद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी मुलीने हिंमत दाखविली म्हणून केळवद पोलिसांनी मुलीच्या आईसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मुलीची आई, तिचा प्रियकर तसेच रवी रामप्रसाद यादव, रामप्रसाद यादव, संजय रतन परमार, राजेश गणपत वछांगी, दुल्हेसिंग गजबसिंग कछवाया व खाला चाची अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. केळवद पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. या मुलीचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुलीचे वडील विभक्त झाले. दोन महिन्यांपासून मुलीच्या आईचे एका युवकासोबत अनैतिक संबंध असून शुक्रवारी (दि. १७) सकाळी या प्रियकराने मुलीच्या आईच्या मोबाइलवर संपर्क साधला.

मुलीसह तिला नयाकुंडा भागात भेटायला बोलाविले. त्याप्रमाणे दोघी नयाकुंड येथे गेल्या. त्यानंतर तिघेही मेयो हॉस्पिटलसमोर आले. तेथे खाला त्यांना भेटली. त्यानंतर कारने अन्य संशयीत आरोपी तेथे आले. सर्व जण कोराडी मंदिरात गेले. 'प्रियकर व खाला चाचीने इंदूरवरून पार्टी आणली आहे. तू काही दिवस त्यांच्यासोबत इंदूरला जा, आपल्याला पैसे भेटणार आहेत', असे सांगून आईने अल्पवयीन मुलीला लग्नास तयार केले केले. त्यानंतर मंदिरात लग्न लावून आई आणि तिचा प्रियकर हे दोघे निघून गेले.

लग्नानंतर एमपी-११-झेडएन-६७१३ क्रमांकाच्या कारने संशयीत आरोपी पीडित मुलीसह इंदूरकडे जायला निघाले. दरम्यान, कारमधील चर्चेदरम्यान आईने २३ हजार रुपयांमध्ये आपली विक्री केल्याची माहिती पीडित मुलीला समजली. तिने यावरून आईसोबत वाद घातला आणि केळवद पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच केळवद पोलिसांचा ताफा पोहोचला. पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आठही जणांना तातडीने अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT