Fraud Case Pudhari
नागपूर

Nagpur News : कर्जाच्या आमिषाने महिलांच्या नावावर ७.६८ कोटींचे व्यवहार; मुख्य आरोपी अटकेत

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावावर तब्बल ७ कोटी ६८ लाख रुपयांचे व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी तहसील पोलिसांनी मुख्य आरोपी मंदा गुमगावकर हिला अटक केली असून न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपी शुभम याचा शोध सुरू असून या व्यवहारांचा सायबर फसवणुकीशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तहसील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदा गुमगावकर हिने सुमारे ३९ महिलांना सहकारी संस्था आणि बचत गटामार्फत सहज कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी प्रत्येक महिलेकडून दोन हजार रुपये तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे जमा करून घेतली. त्यानंतर या कागदपत्रांच्या आधारे संबंधित महिलांच्या नावाने एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँकेत खाती उघडण्यात आली.

महिलांना कोणतीही माहिती न देता या खात्यांमधून ७ कोटी ६८ लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. शांतिनगर परिसरातील एका महिलेच्या नावाने उघडलेल्या खात्यातूनही १७ लाख ८५ हजार रुपयांचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

तहसील आणि शांतिनगर पोलिसांनी संयुक्त तपास करत मुख्य आरोपीला अटक केली. प्राथमिक तपासात ही बँक खाती सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'म्यूल अकाउंट' म्हणून वापरली गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, न्यायालयाने आरोपी मंदा गुमगावकर हिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून फरार आरोपी शुभमचा शोध सुरू आहे. या प्रकरणामागील संपूर्ण सायबर नेटवर्क, आर्थिक व्यवहारांचे स्वरूप आणि इतर आरोपींचा सहभाग याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT