नागपूर

Nagpur Crime : नागपूर हादरले! मध्यरात्री कॅफेमध्ये तरुण-तरुणींची पार्टी अन् राडा; वादातून टोळक्याने कॅफेच पेटवून दिला

तरुणांच्या दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर चक्क जाळपोळीत झाले.

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : उपराजधानीत मध्यरात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या आणि त्यातून होणारे गुन्हे आता नागपूरकरांच्या डोकेदुखीचा विषय ठरू लागले आहेत. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि.२) मध्यरात्री तरुणांच्या दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर चक्क जाळपोळीत झाले. क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर एका संतापलेल्या टोळक्याने थेट कॅफेलाच आग लावून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नेमकी घटना काय?

नंदनवन परिसरातील एका नामांकित कॅफेमध्ये सोमवारी रात्री उशीरा तरुण-तरुणींची पार्टी सुरू होती. रात्री २ वाजेच्या सुमारास ऋषिकेश वाघमारे आणि आरोपी फैझल शेख यांच्या गटात कोणत्यातरी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यानंतर संतापलेल्या फैझल शेख आणि त्याच्या ७-८ साथीदारांनी रागाच्या भरात कॅफेला आग लावून दिली.

नागरी वस्तीत भीतीचे वातावरण

हा परिसर अत्यंत वर्दळीचा असून आजूबाजूला मोठी नागरी वस्ती आणि दुकाने आहेत. कॅफेने पेट घेतल्याचे पाहताच स्थानिकांमध्ये मोठी घबराट पसरली. जागरूक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, अन्यथा इतर दुकानांनाही याचा फटका बसला असता.

पोलिसांची धाव अन् गुन्हा दाखल

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी ऋषिकेश राजेश वाघमारे (वय २६, रा. रेशीमबाग) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी फैझल शेख (२१, रा. राणी दुर्गावती चौक) आणि त्याच्या इतर ८ साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT