Murder Case Pudhari
नागपूर

Nagpur Crime: दोन हजारांसाठी तिघांनी केला गावी निघालेल्या मजुराचा खून

हेमलाल हा पायी रेल्वेस्थानकाकडे निघाला असताना त्याला बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले , यामध्ये त्याचा मृत्यू झाला

पुढारी वृत्तसेवा

नागपूर: आजमशाह चौक परिसरात एका मजुराला लुटून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद आरिफ स्वजिद शेख (२३, रा. खरबी रिंग रोड), प्रफुल्ल ऊर्फ पप्या ताराचंद चौधरी (३०, रा. खरबी चौक) आणि मोहम्मद आसिफ ऊर्फ मोनू ऊर्फ चावल मोहम्मद रशिद (२८, रा. मोठा ताजबाग) अशी आहेत. मृतकाचे नाव हेमलाल राजेंद्र घृतलहरे (३२, रा. कोसमंदी, जि. बलोदा बाजार, छत्तीसगड) असून तो एक श्रमिक होता.

नेमकी घटना काय?

हेमलाल हा पायी रेल्वेस्थानकाकडे निघाला असताना, आजमशाह चौक परिसरात एमएच-४९-एआर-४४८६ क्रमांकाच्या ऑटोतून आलेल्या तीन आरोपींनी त्याला बळजबरीने ऑटोत ओढले. त्यानंतर आरोपींनी त्याला बेदम मारहाण करून त्याच्याकडील दोन हजार रुपये रोख हिसकावून घेतले. मारहाणीत हेमलाल बेशुद्ध पडला. आरोपींनी त्याला गंगाबाई चौक परिसरात ऑटोतून फेकून दिले आणि तेथून पसार झाले.

पोलिसांची कारवाई

गस्तीवर असलेल्या पोलिसांना हेमलाल जखमी अवस्थेत मिळून आला. त्याला तातडीने मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला लकडगंज पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट तीनने तपास करून या तिन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT