Gun Firing Pudhari
नागपूर

Nagpur Gun Firing | नागपुरातील कमाल चौकात मध्यरात्री गोळीबाराने खळबळ; मकोका आरोपींमध्ये वादाची शक्यता!

शनिचरा मार्केट परिसरात फायरिंगची घटना; घटनास्थळावरून काडतूसाचे खोके जप्त, सीसीटीव्ही व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नागपूर शहरातील कमाल चौक येथील शनिचरा मार्केट परिसरात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या कथित गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेतील दोन्ही पक्ष मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत आरोपी असल्याची चर्चा आहे. मात्र, हा प्रकार टोळी संघर्षाशी संबंधित आहे की नाही, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नसून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्याचे नाव जगदीश तर ज्याच्यावर गोळीबार झाला त्याचे नाव अजय असल्याचे सांगितले जात आहे. दोघांच्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तसेच पूर्वीच्या वादांचा तपास पोलीस करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि पाचपावली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून वापरलेल्या काडतूसाचे एक खोके जप्त केले असून ते न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष, मोबाइल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. सर्व बाबींची पडताळणी झाल्यानंतरच अधिकृत माहिती जाहीर करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेनंतर कमाल चौक, शनिचरा मार्केट आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तपासात हा प्रकार परस्पर वैमनस्य किंवा टोळी संघर्षाशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्यास नागपुरातील सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्षाचे आणखी एक गंभीर प्रकरण समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या नागपूर पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून वरिष्ठ अधिकारी संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत माहिती जाहीर केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT