नागपूर : लॉजमध्ये नेऊन पत्नीचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले आणि ते आपल्या प्रेयसीच्या माध्यमातून व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह दोघांविरुद्ध अरोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महेश आणि कुंदा (दोघेही रा. मौदा, जि. नागपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ३० वर्षीय सुष्मिता (नाव बदललेले आहे) हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला शेतमजुरी करते. २०१५ मध्ये तिचा विवाह कुही तालुक्यातील एका युवकाशी झाला होता. मात्र, पहिल्या पतीला दारूचे व्यसन असल्याने तो सतत मारहाण करायचा, ज्यामुळे त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. दरम्यान, सुष्मिताची ओळख मौदा येथील महेश याच्याशी झाली. महेशने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून भंडाऱ्यातील एका मंदिरात तिच्याशी लग्न केले. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच महेशनेही दारू पिऊन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुष्मिता आपल्या माहेरी निघून आली. चार दिवसांनी तिने महेशला फोन करून 'मला परत घेऊन जा' अशी विनंती केली, पण महेशने तिला घरी आणले नाही.
१२ जून रोजी महेशने सुष्मिताला फोन केला. 'मी तुझ्यासाठी खोली भाड्याने घेत आहे' अशी थाप मारून त्याने तिला बोलावून घेतले आणि एका लॉजमध्ये नेले. तिथे मोबाईलद्वारे त्याने सुष्मिताचे काही आक्षेपार्ह फोटो काढले. 'काही दिवसांनी तुला कायमचे घरी घेऊन जातो' असे सांगून त्याने तिला पुन्हा माहेरी पाठवून दिले.
दरम्यान, २१ जून रोजी कुंदा नावाच्या महिलेने सुष्मिताच्या व्हॉट्सॲपवर लॉजमधील ते आक्षेपार्ह फोटो पाठवले. सुष्मिताने याबाबत जाब विचारला असता, 'हे फोटो मला महेशनेच पाठवले आहेत' असे कुंदाने सांगितले. इतकेच नव्हे तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही तिने सुष्मिताला दिली. या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने अरोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह (IT Act) विविध कलमांन्वये महेश आणि कुंदाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.