नागपूर : अभ्यास करत असताना सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून मुलीनेच आपल्या वासनांध पित्याची डोक्यात बॅट मारून हत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. जयराम (वय ४५) असे मृताचे, तर अल्पवयीन प्रीती (वय १७, दोघांचीही नावे बदललेली आहेत) असे पीडित आरोपीचे नाव आहे. जयराम हा कामगार होता, तर प्रीती बारावीत शिकते. तिची आई खासगी काम करते.
गेल्या दोन वर्षांपासून जयराम हा प्रीतीचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. अभ्यास करत असताना तो तिच्याशी अश्लील चाळेही करायचा. वडील असल्याने प्रीतीने याकडे वारंवार दुर्लक्ष केले. मात्र, आज आई व भाऊ बाहेर गेले असताना जयराम दारू पिऊन घरी आला. त्याने प्रीतीला शिवीगाळ करत तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. यावर संतप्त झालेल्या प्रीतीने बॅटने जयरामच्या डोक्यावर जोरदार वार केले.
काही वेळाने तिची आई आणि भाऊ घरी परतले. त्यानंतर सुमारे एका तासाने प्रीतीने स्वतःच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून प्रीतीला ताब्यात घेतले असून तिची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.