Nagpur Crime News : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याने सुनेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. लक्ष्मी रविशंकर पाली (४२) असे मृत सुनेचे नाव असून नथुलाल भगवान पाली (७०) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. सुनेचा खून केल्यानंतर आरोपी सासऱ्याने विहिरीत उडी घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने विहिरीतून बाहेर काढून मेयो रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.
मुलावर जादूटोणा करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याच्या संशयातून सासऱ्याने हे कृत्य केले. मृत लक्ष्मी यांच्या पतीचे २०१९ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर मुलावर जादूटोणा केल्याचा संशय घेत नथुलाल यांचा सुनेसोबत वारंवार वाद होत होता. शनिवारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून नथुलाल यांनी कुऱ्हाडीने लक्ष्मी यांच्या डोक्यावर वार केला, यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.
सुनेचा खून केल्यानंतर आरोपी सासऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने विहिरीतून बाहेर काढून मेयो रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक युनूस चांद शेख यांनी दिली.