नागपूर : एका ६० वर्षीय निराधार महिलेवर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून करणाऱ्या नराधमाचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी अत्यंत कौशल्याने शोध लावला आहे. घटनास्थळी सापडलेले चिप्सचे एक रिकामे पाकीट आणि सीसीटीव्ही फुटेजमधील अस्पष्ट चेहऱ्याला 'डिजिटल तंत्रज्ञाना'च्या (मॉर्फिंग/मार्व्हल) मदतीने स्पष्ट करत पोलिसांनी आरोपीला गजाआड केले.
सुधाकर राधा मंडपे (वय ४८, रा. भन्साळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत वृद्धेची ओळख अद्याप पटलेली नाही.
२८ जून रोजी सावनेर परिसरातील एका शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला सावनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात महिलेवर अत्याचार करून हाताने गळा आवळून तिची हत्या केल्याचे समोर आले. या धक्कादायक खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान ग्रामीण पोलिसांसमोर होते. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह विविध पथकांना तपासाचे निर्देश दिले.
पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता, तिथे चिप्सचे एक रिकामे पाकीट आढळले. मारेकऱ्याने दारूच्या नशेत हा गुन्हा केला असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला. त्या पाकिटाच्या सुगाव्यावरून पोलिसांनी परिसरातील तब्बल १८२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये लाल रंगाचा शर्ट आणि टोपी घातलेला एक संशयास्पद इसम दिसला, पण त्याचा चेहरा अत्यंत अस्पष्ट होता.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील त्या व्यक्तीचा दुरून घेतलेला अस्पष्ट फोटो आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या (मार्व्हल/मार्कवेन) साहाय्याने स्पष्ट (Reconstruct) केला. यामुळे आरोपीचा चेहरा बऱ्यापैकी ओळखता येऊ लागला. पोलिसांनी हा फोटो परिसरातील ९० हून अधिक मजूर आणि नागरिकांना दाखवला. यादरम्यान, संशयित सुधाकर मंडपे हा बोखारा येथील श्रीकृष्णनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलीकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तिथे धाव घेऊन मंडपेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी सुधाकर मंडपेची पार्श्वभूमी तपासली असता, तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. २००५ मध्ये त्याच्याविरुद्ध कळमेश्वर पोलीस ठाण्यात बलात्काराचा, तर २०१८ मध्ये सावनेर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. मृत महिला निराधार असून ती खापरखेडा आणि सावनेर परिसरात फिरायची. ती एकटी असल्याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला व नंतर तिची हत्या केली. न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.