Bribery Case Pudhari
नागपूर

Nagpur Crime : उमरेडमध्ये WCL च्या वरिष्ठ सिव्हिल ओव्हरसियरला ४० हजारांची लाच घेताना सीबीआयचा सापळा

२५.३५ लाखांच्या कामाच्या बिलासाठी ५० हजारांची मागणी; गंगापूर चौकात रंगेहाथ अटक

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : उमरेड परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (WCL) वरिष्ठ सिव्हिल ओव्हरसियरला ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयच्या (CBI) पथकाने रंगेहाथ पकडले. पवन नखाते असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या कामाच्या तिसऱ्या बिलाचे पेमेंट मंजूर करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. गंगापूर चौक परिसरात ३० सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

बिलाच्या मंजुरीसाठी लाचेची मागणी

पिरवा गावाच्या पुनर्वसनस्थळी पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी दोन बोअरवेल, सबमर्सिबल पंप, अंतर्गत मुख्य जलवाहिनी आणि वितरण पाइपलाइन टाकण्याचे काम तक्रारदाराला WCL कडून देण्यात आले होते. या कामाच्या एकूण २५ लाख ३५ हजार ६९३ रुपयांच्या बिलापैकी तिसऱ्या बिलाचे पेमेंट मंजूर करण्यासाठी गोकुळ मुरपार सब एरिया (उमरेड) येथील वरिष्ठ ओव्हरसियर (सिव्हिल) पवन नखाते यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार सीबीआयकडे करण्यात आली होती.

२९ सप्टेंबर रोजी तक्रारीची स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली. यावेळी नखाते यांनी सुमारे २२ लाख रुपयांच्या देय रकमेच्या दोन टक्के रक्कम (म्हणजे ४४ हजार रुपये) आणि यापूर्वीच्या प्रसंगातील १० हजार रुपयांची कथित प्रलंबित रक्कम अशी एकूण ५४ हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. चर्चेअंती ही मागणी ५० हजार रुपयांवर आणण्यात आली होती.

४० हजारांची लाच स्वीकारताना पकडले

पडताळणीत दखलपात्र गुन्हा उघड झाल्यानंतर पवन नखाते यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी सीबीआयने सापळा रचला. उमरेड येथील गंगापूर चौकाजवळ तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नखाते यांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. नखाते यांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT