नागपूर - घरगुती गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर होत असलेला काळा बाजार रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांतील १६३ गॅस वितरकांची तपासणी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून, ११० सिलेंडर जप्त करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.
मध्य पूर्व आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गॅस टंचाई संदर्भात सुरू असलेल्या अफवा तसेच सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रसासनातर्फे ही धडक मोहीम हाती घेण्यात आाली आहे. आज राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये विभागातील १६३ गॅस वितरकांची तसेच गॅस गोडाऊनची तपासणी करण्यात आली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात ७० वितरकांची तपासणी करण्यात आली असून भंडारा जिल्ह्यात ३७, गोंदिया १७, नागपूर जिल्हा १९, अन्न धान्य वितरण अधिकारी ३, वर्धा १५, तर चंद्रपूर जिल्ह्यातील २ ठिकाणी आकस्मिक धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये ११० गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून, १ लाख ७ हजार ९२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या धडक कारवाईमध्ये ५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील २, गोंदिया जिल्ह्यातील १, तर नागपूर जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून २ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय पुरवठा आयुक्त अनिल बन्सोड यांनी दिली. अफवांवर विश्वास ठेवू नका विभागात गॅस सिलेंडरसह पेट्रोल व ड़िझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.