नागपूर

Nagpur Crime : नगरसेवक मोटघरे गोळीबार प्रकरणातील आरोपीला रामेश्वरम येथून अटक

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : खून, खुनाचा प्रयत्न, अमली पदार्थांची तस्करी, 'मकोका' तसेच नगरसेवक शुभम मोटघरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील फरार एमडी तस्कर विशाल फल्ली आणि त्याची मैत्रीण सहेली पंधराम ऊर्फ सोनू यांना गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने अटक केली आहे.

पोलिसांनी तब्बल १,९०० किलोमीटर पाठलाग करून तामिळनाडूतील रामेश्वरम येथून या दोघांना जेरबंद केले. आरोपींना न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन नागपुरात आणले जात आहे.

पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या सोशल मीडिया अकाऊंटचे अचूक तांत्रिक विश्लेषण, तात्काळ निर्णयक्षमता, समयसूचकता आणि १,९०० किलोमीटरचा जलद प्रवास करत ही धडक कारवाई करण्यात आली. युनिट-५ च्या पथकातील पोलीस अंमलदार कदम, नजीर आणि राजू टाकळकर यांनी या कारवाईसाठी विशेष परिश्रम घेतले.

सदर आरोपी हा कुख्यात एमडी तस्कर असून, त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अनेक महिन्यांपासून फरार होता. दरम्यान, बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्र नगर येथून सुमारे १.५४ कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात ६ सराईत आरोपींना अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणातही विशाल फल्ली आणि त्याची मैत्रीण सहेली पंधराम हे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT