नागपूर

Nagpur Crime : इन्स्टाग्रामवरील मैत्री अन् 'प्रेम त्रिकोण'; नागपुरात १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : सोशल मीडियाचा अतिरेक आणि त्यातून निर्माण होणारे प्रेमसंबंध किती घातक ठरू शकतात, याचा प्रत्यय नागपुरात आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमातून निर्माण झालेल्या वादात १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, कळमना पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

नेमकी घटना काय?

जोहरान मुस्तफा शेख (वय १७ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. जोहरान आणि आरोपी अनुराग यादव हे दोघेही एकाच अल्पवयीन मुलीच्या प्रेमात होते. या 'प्रेम त्रिकोणातून' दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोकाचा वाद आणि द्वेष निर्माण झाला होता. मंगळवारी रात्री जोहरानला इन्स्टाग्रामवर एक कॉल आला. त्यानंतर "मित्राला भेटून येतो" असे सांगून तो घराबाहेर पडला, मात्र तो पुन्हा जिवंत परतलाच नाही.

मैदानात गाठून जीवघेणा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री उशिरा वाजपेयी नगरातील अशरफी मशिदीजवळील मोकळ्या मैदानात जोहरानवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. आरोपीने जोहरानच्या डोक्यावर आणि मानेवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जोहरानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

पोलिसांत गुन्हा दाखल

मृत जोहरानच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी अनुराग यादव विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT