Nagpur cricket accident
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे क्रिकेट खेळत असताना अवघड जागी बॉल लागून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रणव आगलावे असे मृत मुलाचे नाव आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच वडिलांचे छत्र हरपलेल्या या मुलाच्या अकाली निधनामुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
बुधवारी (दि. १६) संध्याकाळच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. प्रणव हा भिवापूर महाविद्यालयाच्या मैदानावर काही मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळ सुरू असताना अचानक बॅटने मारलेला बॉल वेगात येऊन प्रणवच्या लघवीच्या नाजूक भागाला लागला. बॉल लागल्याचा आघात इतका मोठा होता की, प्रणव जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला.
घाबरलेल्या मित्रांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून प्रणवला मृत घोषित केले. बॉलच्या आघातामुळे त्याला गंभीर अंतर्गत दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. प्रणवच्या कुटुंबावर अवघ्या दोन महिन्यांत दुःखाचा दुसरा डोंगर कोसळला आहे. दोन महिन्यांपूर्वीच प्रणवचे वडील अनिल आगलावे यांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनाचे दुःख ताजे असतानाच, प्रणवच्या अशा अनपेक्षित मृत्यूमुळे आगलावे कुटुंब पूर्णपणे कोसळले आहे. पिता-पुत्राच्या अकाली निधनामुळे भिवापूर परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.