नागपूर - आगामी मनपा निवडणुकीसाठी झोनल कार्यालयात उद्या नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. सकाळी 11 ते 3 अशी वेळ असताना अद्यापही महायुती, महाविकास आघाडीचे जागा वाटप, उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. अशात भाजपने अनेक माजी नगरसेवकांना डच्चू देत धक्कातंत्राने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
गडकरी समर्थकांना झुकते माप दिसत आहे. सलग दहा पंधरा वर्षे काम करून काय उपयोग, असा संतप्त सवाल कार्यकर्ते करीत आहेत. आज रात्रीपर्यंत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून फोन गेले. संबंधिताना एबी फॉर्म वाटप करण्यात आले. कुठे राजी कुठे नाराजी दिसली. इच्छुकांना अश्रू अनावर झाले. अनेकांनी तिकीट वाटपावर संताप बोलून दाखविला. यातील बरेचजण उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
नागपुरातील 151 जागांपैकी 120 जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले असून 140 जागा भाजप स्वतः लढण्याचे पवित्र्यात आहे. अर्थातच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. अशावेळी शिवसेना शिंदे गटाला दहापेक्षा कमी जागा मिळणार असल्याने शिवसेनेतही प्रचंड नाराजी आहे. यामुळेच महायुतीत नागपुरात सध्या घमासान सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बैठका सुरूच आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक आमदार यांच्या सोमवारी रात्री उशिरापर्यंत बैठका झाल्या. आज सकाळपासून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपली नाराजी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. पंधराशेवर इच्छुक असल्यावर 151 जागांवर कशी संधी मिळणार असा सवाल महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केला. यामुळेच वेळेवर अडचण नको म्हणून तीनशेवर उमेदवारांना कागदपत्रे तयार ठेवण्यासाठी सांगण्यात आले असून प्रसंगी भाजप नागपुरात स्वतंत्रपणे लढणार आहे.
काँग्रेस मधून आले आणि तिकीट मिळाले असल्याने उमेदवार यात असल्याने भाजपची आम्ही काँग्रेस होऊ देणार नाही, बाहेरून आलेल्यांना पक्षश्रेष्ठींनी तिकीट दिल्यास आमच्या प्रभागात भाजपचे बूथ सुद्धा लावणार नाहीत असा इशारा दिला जात आहे. मात्र, आम्ही समजूत घालू, सर्वजण भाजप उमेदवारांचे काम करतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. अनेक प्रभागांमधून उद्या ही नाराजी अपक्ष उमेदवारी स्वरूपात पुढे येण्याची शक्यता आहे.