कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मेट्रो भवनवर पगारवाढीबाबत मोर्चा काढला.  
नागपूर

नागपूर : कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मेट्रो भवनवर धडकला मोर्चा

कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीबाबत व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : केंद्र सरकारप्रमाणे मेट्रो कर्मचाऱ्यांना वेतन द्या, या मागणीसाठी शुक्रवारी (दि.३१) जवळपास ७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मेट्रो भवनवर धडक मोर्चा काढला. नागपूर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना वेतन वाढबाबत निवेदन देत कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. १० दिवसात तोडगा काढला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

नागपूर मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघटनेकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वेतन मिळावे, यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार, आंदोलन करण्यात आले. सन २०१९ पर्यंत नागपूर मेट्रोमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वेतन मिळत होते. परंतु त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता राज्य शासनाच्या दुकाने व आस्थापना या कायद्यानुसार वेतन निश्चिती करून फक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्यात आले.

तसेच मेट्रोमधील जे अधिकारी व कर्मचारी स्थायी स्वरूपात कार्यरत आहेत त्यांना केंद्राप्रमाणे लाखो रुपये वेतन दिले जात असून स्टेशनवरील काम करणाऱ्या हाउसकीपिंग सुरक्षारक्षक तिकीट विक्रेते या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या दुकाने व आस्थापनाद्वारे मिळणारे कमी वेतन दिले जात आहे. संघटनेद्वारे अनेकवेळा मेट्रो प्रशासनाला पत्रव्यवहार करून याची जाणीव करून दिली परंतु मागील चार वर्षापासून मेट्रो प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्षच केल्याचे दिसून आले. या आंदोलनाचे नेतृत्व नागपूर मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या संरक्षिका शिवानी दाणी, भारतीय मजदूर संघाचे महामंत्री गजानन गटलेवार , अध्यक्ष महेश खांदारे , महामंत्री नितीन कुकडे, उपाध्यक्ष रोहित नारनवरे, सचिव आशिष समुद्रवार, शुभम वेलंकीवार, अभिषेक खुळे संघटन सचिव प्रांजल चौधरी, सदस्य आकाश भिमटे, रिंकू वेखंडे, निलेश कोढे यांच्यासह इतर पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT