नागपूर - भाजप नेते,मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर नागपुरात 8342 मुस्लिम मतदारांनी दुबार मतदान केल्याचा आरोप केल्याप्रकरणी काँग्रेसचे जेष्ठ नेते, आमदार डॉ. नितीन राऊत यांनी आज बुधवारी जरीपटका पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भाजपचे नेते आशीष शेलार यांच्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, सांप्रदायिक वक्तव्यावरून आज जरीपटका पोलिस ठाण्यात शेलार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासंबंधी अर्ज केला गेला. भारताचे नागरिक धर्माने नव्हे, संविधानाने ओळखले जातात या शब्दात डॉ. नितीन राऊत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला.
भाजपकडे कोणतेही पुरावे असतील तर ते निवडणूक आयोगाकडे द्यावे
“भाजप सरकारचा मंत्री आरोप करतो म्हणजे त्यांनीच आपल्या सरकारच्या अधिपत्याखाली गैरप्रकार होत असल्याची कबुली दिलीय!निवडणूक आयोग गप्प आहे, शांत आहे पण भाजपची अस्वस्थता हे त्यांच्या असुरक्षिततेचे लक्षण आहे. 'जेव्हा दलित, ओबीसी, शोषित आणि अल्पसंख्याक समाज जेव्हा जेव्हा एकत्र येतो, तेव्हा भाजपला 'व्होट जिहाद' दिसतो ही त्यांची कृती घाबरण्याचीच नव्हे तर संविधानद्रोही मानसिकतेची खूण आहे. शेलार यांचे वक्तव्य हे भारतीय दंड संहिता कलम १५३A, २९५A, आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम १२३(३) अंतर्गत “धार्मिक आधारावर मत मागणे किंवा तिरस्कार पसरवणे" या गुन्ह्याच्या चौकटीत मोडते.