Nagpur News : उंदीर पकडण्यासाठी लावलेल्या ग्लू पॅडवर अडकला कॉमन वुल्फ स्नेक; सर्पमित्रांनी केली सुखरूप सुटका 
नागपूर

Nagpur News : उंदीर पकडण्यासाठी लावलेल्या ग्लू पॅडवर अडकला कॉमन वुल्फ स्नेक; सर्पमित्रांनी केली सुखरूप सुटका

मानकापूर, नागपूर येथील पासपोर्ट कार्यालयातील घटना

पुढारी वृत्तसेवा

नागपूर :  मानकापूर येथील पासपोर्ट कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर उंदीर पकडण्यासाठी रात्रीच्या सुमारास ग्लू पॅड लावण्यात आले होते. सकाळी कार्यालय उघडल्यानंतर त्या ग्लू पॅडवर एक साप चिपकलेला आढळून आला. ग्लूच्या चिकटपणामुळे सापाला हालचाल करणे शक्य होत नव्हते. ही बाब लक्षात येताच अभिषेक बजाज यांनी सर्पमित्र सागर सावळे यांच्याशी संपर्क साधला.

सागर सावले यांनी पाहिल्यानंतर हा कॉमन वुल्फ स्नेक (Common Wolf Snake – Lycodon aulicus) असल्याचे ओळखले. अशा प्रकारे ग्लू पॅडवर साप अडकलेला त्यांनी पहिल्यांदाच पाहिला होता. सापाची सुरक्षित सुटका करण्यासाठी त्यांनी "हेल्प फॉर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन, नागपूर" चे स्वप्निल बोधाने यांच्याशी संपर्क साधला.

 स्वप्निल बोधाने यांच्या मार्गदर्शनानुसार सोयाबीन तेलाचा वापर करून ग्लू पॅडचा चिकटपणा हळुवारपणे कमी करण्यात आला. कोणतीही घाई किंवा जोराचा वापर न करता सापाला ग्लूपासून अलग करण्यात आले. काही वेळातच सापाची हालचाल पूर्ववत झाली. सापाला कोणतीही दुखापत झालेली नाही याची खात्री केल्यानंतर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

 कॉमन वुल्फ स्नेक (Lycodon aulicus) हा बिनविषारी (Non-venomous) साप आहे. तो प्रामुख्याने रात्री सक्रिय असतो. त्याचा आहार पाली, सरडे, बेडूक तसेच इतर लहान प्राण्यांवर आधारित असतो. हा साप मानवी वस्तीजवळही आढळतो. घरांच्या भिंतीतील फटी, दगडांचे ढीग, लाकडाचे ढीग, झाडांच्या पोकळ्या, बागा, शेतजमीन आणि झुडपी भाग अशा विविध ठिकाणी तो आढळू शकतो. तो खडबडीत पृष्ठभागावर चांगल्या प्रकारे चढू शकतो.

 ग्लू पॅडमुळे वन्यजीवांना धोका

 उंदीर नियंत्रणासाठी वापरले जाणारे ग्लू पॅड केवळ उंदरांसाठीच नव्हे तर साप, पाल, सरडे, पक्षी आणि इतर लहान वन्यजीवांसाठीही धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे शक्य असल्यास वन्यजीवांना अडकण्याचा धोका निर्माण करणाऱ्या अशा पद्धतींचा वापर टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT