नागपूर -नागपूर आणि विदर्भात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. रोजगार निर्मिती, उद्योगांचा विकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, महसूल अशा सर्वच क्षेत्रात विकास सुरु असून देशासह महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी संकल्पबद्ध होवून कार्य करण्याचे आवाहन, महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केले.
कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार श्यामकुमार बर्वे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अपर आयुक्त डॉ. माधवी चवरे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला आधार ठेवूनच देशाची विविध क्षेत्रात प्रगती होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाकडे अग्रेसर आहे. प्रधानमंत्र्यांनी देशाला वर्ष 2047 पर्यंत विकसित करण्याचा संकल्प केला आहे. पुढच्या दहा वर्षात देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने विविध क्षेत्राचा विकास होत आहे.
दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमी फोरममध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यात 15 लाख 70 हजार कोटींची गुंतवणूक आणली. नागपूरसह विदर्भातही मोठी गुंतवणूक आली आहे. नागपुरात रोजगार निर्मितीसाठी ऑटोमोबाईल ईव्ही क्षेत्रात 500 कोटी तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात (लिथियम बॅटरी) 42 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. बुटीबोरी भागात हरीत ऊर्जा क्षेत्रात जवळपास 16 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे.
भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बावनकुळे यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या ‘घर घर संविधान’ या प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती चित्ररथास हिरवी झेंडी दाखविण्यात आली. सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी हा चित्ररथ संपूर्ण जिल्ह्यांमध्ये फिरवण्यात येणार असल्याची माहिती दिली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. य कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक साळीवकर, आकाशवाणीच्या प्रांजली बाविस्कर आणि महेश बागदेव यांनी केले.
दरम्यान, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा बावनकुळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपायुक्त रोशन यादव, वरिष्ठ तुरुंगाधिकारी वामन निमजे आदींसह राष्ट्रपती पदक विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. ध्वजनिधी संकलन, गौरव पुरस्कार, जिल्हा क्रीडा पुरस्कार, जिल्हा युवा पुरस्कार, पोलीस पाटील उल्लेखनीय शौर्य पुरस्कार आदी पुरस्कार प्रदान करण्यात आले.