नागपूर

Nagpur News : दोन्ही पायांनी दिव्यांग, पण जिद्द मात्र बुलंद!

रोजगारासाठी नागपूर गाठलेल्या हरिदास बिरादरला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा मदतीचा हात

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : परिस्थितीने दोन्ही पाय हिरावून घेतले, मात्र स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न हिरावून घेऊ शकली नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी हैदराबादहून नागपूर गाठले. हाताला काम मिळावे, चार पैसे कमावता यावेत आणि कोणापुढेही मदतीसाठी हात पसरावे लागू नयेत, हीच माफक अपेक्षा मनात होती. मात्र, दिव्यांगत्वामुळे रोजगाराच्या संधी मिळत नव्हत्या. अखेर रेल्वे क्लब चौकात एका सहकाऱ्यासोबत मदतीच्या प्रतीक्षेत दिवस काढण्याची वेळ आली. अशाच एका दिवशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नजर हरिदास बिरादर याच्यावर पडली आणि त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.

हरिदासचे वय अवघे ३४ वर्षे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील ऑटो चालवतात, तर आई दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी व घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. अशा परिस्थितीत कुटुंबावर ओझे न बनता स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवावे, या जिद्दीने हरिदास रोजगाराच्या शोधात नागपूरला आला. मात्र, दोन्ही पायांनी दिव्यांग असल्याने त्याला काम मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रोजगाराची संधी न मिळाल्याने काही दिवस नागरिकांकडून स्वेच्छेने मिळणाऱ्या मदतीवर त्याला गुजराण करावी लागली.

हरिदासच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे त्याला केवळ आर्थिक मदतीची अपेक्षा नव्हती, तर स्वतःच्या कष्टाने आणि मेहनतीने जगण्याची संधी हवी होती. त्याने एका सहकाऱ्याच्या मदतीने डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, हे काम करण्यासाठी दुचाकीची आवश्यकता होती.

हरिदासची ही गरज आणि स्वावलंबी होण्याची प्रबळ इच्छाशक्ती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मनाला भिडली. त्यांनी त्याला मदतीचे आश्वासन दिले. दिलेला शब्द पाळत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून हरिदासला नवीन कोरी स्कुटी भेट दिली.

स्कुटीच्या चाव्या हातात पडल्या, तेव्हा हरिदाससाठी ती केवळ एक दुचाकी नव्हती, तर स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या स्वप्नाची पहिली पायरी होती. आजवर मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हातांना आता कष्टाच्या बळावर स्वाभिमानाने जगण्याचा आधार मिळाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या संवेदनशील पुढाकारामुळे हरिदासच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाला असून, त्याच्या स्वावलंबनाच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT