Nagpur London Street Tree Felling
नागपूर: नागपूर येथील लंडन स्ट्रीट परिसरात विकासकामांसाठी झाडांची तोड सुरू असल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. वृक्षतोड तातडीने थांबवावी, या मागणीसाठी नागरिकांनी घटनास्थळी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. यावेळी झाडांना मिठी मारून ‘चिपको आंदोलन’ करत वृक्षतोडीचा निषेध करण्यात आला.
विकासकामांच्या नावाखाली परिसरातील हिरवळ नष्ट करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. अनेक वर्षांपासून पर्यावरणाचा समतोल राखणारी झाडे तोडली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ‘विकास हवा, मात्र त्यासाठी झाडांची किंमत मोजावी लागणार असेल तर असा विकास कशासाठी?’ असा सवालही पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला.
लंडन स्ट्रीट परिसरात झाडांची तोड सुरू असल्याची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमी आणि नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी झाडांना मिठी मारून वृक्षतोड रोखण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी हातात फलक घेत वृक्षतोडीविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विकासकामांचे नियोजन करताना पर्यावरणीय परिणामांचाही विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
शहरात वाढते तापमान, प्रदूषण आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर झाडांचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे विकासकामांसाठी सरसकट वृक्षतोड करण्याऐवजी पर्यायी मार्गांचा विचार करावा, तसेच शक्य तितकी हिरवळ जपावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
लंडन स्ट्रीटवरील या आंदोलनामुळे ‘विकास की पर्यावरण?’ हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने वृक्षतोडीबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करून पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.