नागपूर: मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने मानसिक तणावातून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१६) उघडकीस आली. तुळशीराम शेंडे (वय ५४) असे मृत कैद्याचे नाव असून, त्याने बराकीमधील बाथरूममध्ये चड्डीच्या इलॅस्टिकचा वापर करून गळफास घेतला. घरी जाण्यास मिळत नसल्याने तो तणावात असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशीराम हा मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होता. भंडारा जिल्ह्यातील एका हत्या प्रकरणात त्याला ३० जून २०२४ रोजी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.
कारागृह सूत्रांनी सांगितले की, कोरोना काळात तुळशीराम पॅरोलवर घरी गेला होता. मात्र, मुदतीत परत न आल्याने त्याच्यावर कारवाई झाली होती. यानंतर त्याला पुन्हा घरी जाण्यासाठी रजा मिळाली नाही. अनेक दिवसांपासून घरी जाता येत नसल्याने तो प्रचंड मानसिक तणावात होता, अशी माहिती समोर आली आहे.
ही घटना कारागृहातील छोटी गोल परिसरातील बराक क्रमांक ४ मध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कारागृहातील कैद्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.