नागपूर : नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे मेडिकल बोर्डाचे शिफारसपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मेयोच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख तथा मेडिकल बोर्डाचे अध्यक्ष आणि त्यांच्या स्टेनोग्राफरला ताब्यात घेतल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) कथित लाचप्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. मेडिकल बोर्डाचे शिफारसपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख तथा मेडिकल बोर्डाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर कमलनारायण जायसवाल आणि त्यांचे स्टेनोग्राफर आशीष मेटेकर यांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वर्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ते वैद्यकीय रजेवर होते. सेवेत पुन्हा रुजू होण्यासाठी त्यांना मेयो रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डाकडून शिफारसपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक होते.
यासाठी तक्रारदाराने मेडिकल बोर्डाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जायसवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी प्रमाणपत्र देण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची दखल घेत एसीबीने 24 जून रोजी या प्रकरणाची पडताळणी केली. तपासादरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच चर्चेनंतर आरोपी 30 हजार रुपयांऐवजी 20 हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाल्याचेही तपासात समोर आले.
त्यानंतर एसीबीने सापळा रचला. मात्र, तक्रारदाराबाबत संशय आल्याने आरोपींनी प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली नसल्याचे सांगण्यात आले. तरीदेखील लाचेची मागणी झाल्याची खात्री झाल्यानंतर एसीबीने 30 जून रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत कारवाई केली.
या प्रकरणी नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईनंतर मेयो रुग्णालय प्रशासनात आणि वैद्यकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.