नागपूर : काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एशियन फायर वर्क्स या कंपनीमध्ये रविवारी (दि.१६) स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. या दुर्घटनेच्या ठिकाणी महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (दि.१७) भेट देत कामगारांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मृतांच्या कुटुंबियांना कंपनीतर्फे २० लाख तर जखमींना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश कंपनी व्यवस्थापनाला पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यासोबतच जिल्ह्यातील सर्वच स्फोटके निर्मिती करणाऱ्या २३ कंपन्यांच्या सुरक्षिततेची संबंधित यंत्रणेने काटेकोरपणे तपासणी केली पाहिजे. स्फोटक निर्मिती कंपन्या या सदैव आव्हानात्मक परिस्थिती स्वीकारून तत्पर असायला हव्यात. त्यामुळे अशा अस्थापनांनी सुरक्षेची अतिशय काळजी घेण्याची गरज असते. वारंवार जर अशा घटना घडत असतील व यात जीवितहानी होत असेल तर विशेष तपासणी मोहिमेचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले. तसेच कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना नियमानुसार पीएफ उपलब्ध करून द्यावा, कुठल्याही कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवू नये, असे निर्देशही दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी पियूष चिवंडे, पोलीस अधिकारी नरेश म्हस्के, कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त उज्वल लोया, तहसीलदार राजू रणवीर यांच्यासह कामगार, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.