Rohit Khopde resigns BJP
नागपूर : पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा रोहित खोपडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक, सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेली चार टर्म भाजप आमदार असलेले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सर्वाधिक 74 हजारांचे मताधिक्य देणारे कृष्णा खोपडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपने यावेळी धक्का तंत्र अवलंबत अनेक माजी नगरसेवकांचे तिकीट कापले आहे. अर्थातच हे बंड कुठवर टिकणार हे महत्वाचे आहे. आज मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र सुरू आहे. अनेक जण बंडखोरी करणार आहेत.या सर्वांची समजूत घालण्याचे काम आता पुढील तीन-चार दिवसांत मावळत्या वर्षाला निरोप, नव्या वर्षाचे स्वागत करताना भाजपच्या नेते मंडळींना करावे लागणार आहे.
सोमवारी दिवसभर या संदर्भातील नाराजी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत भेटून मांडली बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिले गेल्यास आम्ही भाजपचे काम करणार नाही. बूथ लावू देणार नाही, असा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर आता आमदारपूत्राचे तिकीट कापले गेल्याने ते नेमका कोणता पवित्रा घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आज दुपारी तीन वाजल्यानंतर आमदार पुत्र नेमके कुठे, याचा शोध लागणार आहे. भाजपची आम्ही काँग्रेस होऊ देणार नाही, बाहेरून आलेल्यांना पक्षश्रेष्ठींनी तिकीट दिल्यास आमच्या प्रभागात भाजपचे बूथ सुद्धा लावणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील धरमपेठ प्रभाग 15 मधील भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी दिला.
नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी धडक दिली. मनपा निवडणुकीची नामांकन प्रक्रिया आज अंतिम टप्प्यात असताना भाजपची ही नाराजी पुढे आली आहे. महापालिकेसाठी भाजप, शिवसेना उमेदवारांची यादी आज नामांकन मुदत संपल्यावरच जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन्हीकडे नाराजीत राजीनामा सत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहे. या पार्श्वभूमीवर बाहेरून केवळ तिकिटासाठी पक्षात येणाऱ्यांना भाजपचे तिकीट दिले गेल्यास आम्ही पक्षासाठी काम करणार नाही, ही भूमिका भाजपचे निष्ठावंत आता घेताना दिसत आहेत.