Bhandewadi leopard
नागपूर: पूर्व नागपुरातील भांडेवाडी या दाट वस्तीच्या परिसरात राऊत यांच्या घरात थेट दुसऱ्या माळ्यावर शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सकाळी साडेनऊ पासून हा थरार अखेर चार तासांनी संपला.
या बिबट्याला बेशुद्ध करून एका पिंजऱ्यात गोरेवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला नेण्यात आले. त्याच्या वैद्यकीय तपासणी नंतर वरिष्ठ अधिकारी पुढील निर्णय घेतील, अशी माहिती देण्यात आली. राऊत कुटुंबियांना सकाळी या बिबट्याची शेपटी दिसल्याने सर्वांनी लगेच घर सोडले. इकडे पहिल्या माळ्यावरून तो दुसऱ्या माळ्यावर गेला. बाहेर हजारो लोकांची गर्दी आणि दाट लोकवस्ती असल्याने पोलिसांनी हा परिसर मोकळा केला.
ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचे लोकेशन घेतल्यानंतर त्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात वन विभाग, रेस्क्यू टीमला यश आले. घरात बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच पोलीस व वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. उमरेड कराडला परिसरातून हा बिबट्या भांडेवाडी जंगल परिसरात आला असावा, असे बोलले जाते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अनेकजण मोबाईलमध्ये फोटो, व्हिडीओ काढण्यात गुंतले होते.