नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांदरम्यान गोंधळ झाल्याप्रकरणी आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. भूपेंद्र वासनिक यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेसह न्यायालयाने स्वतःहून दखल घेतलेल्या (सुओ मोटो) याचिकांवर ही सुनावणी पार पडली.
मागील सुनावणीत, संविधान चौकात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजवणे, घोषणाबाजी करणे आणि फटाके फोडणे यांसारखे प्रकार घडल्याचे समोर आले होते. पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. मात्र, आयोजकांपैकी केवळ दोघांनीच न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर केल्यामुळे, उर्वरित आयोजकांना अखेरची संधी देत न्यायालयाने पुढील सुनावणी २९ जुलैपर्यंत तहकूब केली.
तसेच ध्वनी व इतर प्रदूषणाबाबतच्या तक्रारींसाठी ऑनलाइन पोर्टल उभारण्याच्या कामाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. याशिवाय ध्वनी व वायू प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी व्हिडिओ क्लिप तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
ताजबाग परिसरात मोठ्या आवाजात डीजे...
दरम्यान, सुनावणीदरम्यान न्यायालय मित्रांनी (अमिकस क्युरी) पोलिसांच्या प्रतिज्ञापत्रात डीजेच्या आवाजाची डेसिबल पातळी आणि फटाक्यांमुळे झालेल्या ध्वनी प्रदूषणाबाबत पुरेशी माहिती नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर न्यायालयाने "फटाके फोडणाऱ्यांवर कोणती कारवाई केली?" असा सवाल उपस्थित करत या मुद्द्यांवर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले. तसेच, गेल्या दोन दिवसांत इतवारी ते ताजबाग परिसरापर्यंत विविध कार्यक्रमांमुळे झालेल्या ध्वनी प्रदूषणावरही न्यायालयाने चिंता व्यक्त केली. नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.