Nagpur Cow Injured Vehicle Collision  Pudhari
नागपूर

Nagpur Cow Injured | पाच तास पावसात जखमी गाय रस्त्यावर तडफडत राहिली; व्हिडिओ व्हायरलनंतर महापालिकेला जाग

बालाजी नगरातील धक्कादायक घटना; लोकप्रतिनिधींच्या वारंवार संपर्कानंतरही पशू रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही, प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Cow Injured Vehicle Collision

नागपूर : नागपूरच्या बालाजी नगर परिसरात प्रशासनाच्या संवेदनशून्य कारभाराचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेली एक गाय तब्बल पाच तास मुसळधार पावसात रस्त्यावर वेदनेने तडफडत पडून होती.

लोकप्रतिनिधींनी वारंवार महापालिकेशी संपर्क साधूनही मदत वेळेत न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे. अखेर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरच महापालिका प्रशासनाने हालचाल करत जखमी गायीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

गुरुवारी रात्री बालाजी नगर परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या गायीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला, तर गंभीर जखमी झालेली गौमाता रस्त्यावरच कोसळली.

घटनेची माहिती मिळताच धंतोली झोनच्या सभापती भारती बुंदे आणि त्यांचे पती विकास बुंदे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महापालिकेच्या पशू रुग्णवाहिका सेवेशी अनेकदा संपर्क साधून तातडीने मदत पाठविण्याची विनंती केली. मात्र, तब्बल पाच तास कोणतेही पथक घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप करण्यात आला.

या काळात मुसळधार पावसात जखमी गौमाता वेदनेने विव्हळत होती. स्थानिक नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडवत तिच्यावर कापड टाकून पावसापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जबाबदार यंत्रणा निष्क्रिय असल्याचे चित्र दिसून आले. शुक्रवारी सकाळी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर पशू रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि जखमी गौमातेला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

या घटनेमुळे महापालिकेच्या आपत्कालीन सेवांच्या कार्यक्षमतेवर आणि संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका मुक्या जीवाला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींना किती तत्परतेने प्रतिसाद दिला जात असेल, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT