नागपूर : बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सराफ व्यवसायिकाकडून १ किलो सोने, १५ किलो चांदी व रोख १ लाख २५ हजार असा एकूण १ कोटी १५ लाखांच्या मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर सराफा व्यवसायिकाची कार घेऊन ते पसार झाले. ही घटना बुधवारी (दि.२) रात्री पिपळा डाकबंगला येथे घडली. घटनेनंतर काही तासातच सराफा व्यवसायिकाची कार पाटणसावंगी शिवारात आढळून आली. त्यामुळे दुसऱ्या वाहनाने दरोडेखोर पसार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पिंपळा डाकबंगला सर्व्हिस रोड मार्गावर निहारिका ज्वेलर्स आहे. त्याचे मालक रवी मुसळे आणि त्यांचा पुतण्या मयंक मुसळे हे दोघे बुधवारी (दि.२) रात्री आठच्या सुमारास घराकडे जाण्यास निघाले. मयंकने सोन्याचांदीचे दागिने भरलेली बॅग कारमध्ये ठेवली. रवी व मयंक कारमध्ये बसत असताना दरोडेखोरांनी हवेत दोन गोळ्या फायर केल्या. त्यानंतर दोघांना मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून सोन्या- चांदीचे दागिने असलेली बँग हिसकावून घेतली. ती बँग व रोकड त्यांच्याच कारमध्ये ठेवून ती कार घेऊन ते पसार झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व खापरखेडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दरोडेखोर नागपूरच्या दिशेने पळून जात असल्याचे दिसून आले. दरोडेखोरांना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व खापरखेडा पोलिसांची पथके तयार करण्यात आली. रात्री ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार हे खापरखेडा पोलिस ठाण्यात दाखल झाले. तपासादरम्यान सराफ व्यवसायिकाची कार ९ वाजता पाटणसावंगी शिवारात आढळून आली.
निहारिका ज्वेलर्समध्ये यापूर्वीही चोरीची घटना घडली होती. पाटणसावंगी शिवारात टोलनाका आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपण दिसू, याची दरोडेखोरांना कल्पना होती. त्यामुळे पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी दरोडेखोर कारने नागपूरच्या दिशेने पळून गेले. पिपळा डाकबंगला शिवारातील अंडरपास पूल ओलांडून पलीकडच्या सर्व्हिस रोडने सावनेरमार्गे पळून गेले. पाटणसावंगी शिवारात कार सोडून दरोडेखोर धापेवाडामार्गे सोबत आणलेल्या दुसऱ्या वाहनाने पळाले.
बुधवारी रात्री पावसामुळे त्या ठिकाणाची वीज गेली होती. या अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी दोघांना गाठले. चार जणांनी हा दरोडा टाकल्याची माहिती समोर आली आहे.
निहारिका ज्वेलर्समध्ये दरोडा टाकून १ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाले. परिसरातील काहींनी दरोडेखोरांना टीप दिल्याचा पोलिसांना संशय आहे. सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. पाऊस व काही ठिकाणची बत्ती गूल असल्यामुळे सीसीटीव्ही फुटेज मिळण्यात अडचणी येत आहेत.