Anil Deshmukh  (Pudhari Photo)
नागपूर

Anil Deshmukh: रुग्णालयांचा अग्निसुरक्षा अहवाल ८ महिने धूळ खात का ठेवलाय? अनिल देशमुखांचा सरकारला सवाल

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे तीन नवजात बालकांचा मृत्यू झालेल्या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Nagpur news Anil Deshmukh

नागपूर : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे तीन नवजात बालकांचा झालेला दुर्दैवी मृत्यू ही केवळ एक तांत्रिक दुर्घटना नसून, प्रशासकीय निष्काळजीपणा आणि अक्षम्य अनास्थेचा परिपाक आहे. या दुर्घटनेची चौकशी केवळ व्हेंटिलेटरच्या तांत्रिक बिघाडापुरती मर्यादित न ठेवता, रुग्णालयाचे प्रशासन, वैद्यकीय अधीक्षकांची जबाबदारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांवरील अतिरिक्त कार्यभाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी ठाम मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी लागलेल्या भीषण आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक दुर्घटनेनंतर राज्यभरातील रुग्णालयांची अग्निसुरक्षा सुधारण्यासाठी विशेष तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, या समितीने दिलेल्या अहवालावर आणि शिफारशींवर आठ महिने उलटूनही सरकारने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. हा अहवाल आज धूळ खात पडला असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला.

अमरावती दुर्घटनेत केवळ तांत्रिक दोष दाखवून मूळ जबाबदारांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये. रुग्णालयाचे व्यवस्थापन कोणाकडे होते, वैद्यकीय अधीक्षकांचे नियंत्रण कसे होते आणि जिल्हा शल्यचिकित्सकांवर प्रशासकीय कामाचा ताण असताना त्यांच्यावर हॉस्पिटल मॅनेजमेंटची अतिरिक्त जबाबदारी का लादली गेली, याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. भंडारा दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाचे उपायुक्त प्रभात राहांगदळे यांच्या नेतृत्वाखालील समितीने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष का केले जात आहे? असा प्रश्नही अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षेचे नियमित प्रशिक्षण देणे बंधनकारक करावे. रुग्णालयांमध्ये जीव रक्षक उपकरणांची चोख देखभाल करण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक यंत्रणा उभी करावी. महाराष्ट्र अग्निशमन सेवेत मंजूर करण्यात आलेल्या १३८ नवीन पदांची भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करून अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्यात यावी. राज्यातील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेसाठी आणि देखभालीसाठी बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात यावी, असे ते म्हणाले.

भंडारा दुर्घटनेनंतरही जर शासन जागे होणार नसेल आणि अहवाल कागदावरच राहणार असतील, तर अशा घटना वारंवार घडत राहतील. अमरावतीत तीन निष्पाप बालकांचे प्राण गेले आहेत; या बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय घटकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT